डॉक्टर मिलिंद नरोटे यांची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मोर्चेबांधणीला सुरवात …

0
330

 

डॉ.मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावागावात लागले बॅनर..

 

 

गडचिरोली -३१जुलै २०२३

पुढच्या वर्षी होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षाकडून इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही इच्छुकांनी राजकीय वातावरण निर्मिती करण्यास सुरवात केली आहे. सध्या या क्षेत्रात चर्चा आहे ती डॉक्टर मिलिंद नरोटे यांची.. याला कारणही तसेच आहे की 30 जुलै रोजी डॉक्टर मिलिंद नरोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतील गावागावात दिसले. यामुळे पुन्हा एक डॉक्टर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदारकीसाठी नशीब आजमावण्याचा तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टर मिलिंद नरोटे हे मूळचे चामोर्शी तालुक्यांतील रेखेगाव येथील असून ते एम. बि. बी. एस. डॉक्टर आहेत. गडचिरोली शहरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. ते आपल्या स्पंदन फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबवितात आता त्यांची राजकीय महत्वकांक्षा लपून राहिली नसून त्यांनी आपली राजकीय गणिते जुळविण्यास सुरवात केली आहे. ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असून भाजपच्या एका गटासोबत त्यांची नेहमीच उठबस असते. इतकेच नव्हे तर हा गट डॉ मिलिंद नरोटे यांना भाजपची तिकीट मिळावी यासाठी आतापासूनच लॉबिंग करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असे झाले तर भाजपचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी आणि डॉ. मिलिंद नरोटे यांच्यात विधानसभा उमेदवारीच्या तिकिटासाठी रस्सीखेच होणार हे आता जवळपास स्पष्टच झाले आहे. जर त्यांना तिकीट मिळाली नाही तर ते अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावू शकतात अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयानी बोलून दाखविली आहे. विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांचा पत्ता कट करण्यासाठीं भाजपचा एक गट पडद्यामागुन राजकीय हालचाली करत असल्याची चर्चा आहे. नुकतेच डॉ. होळी यांच्या काही विधानावरून राजकीय वातावरण तापविण्यात या गटाचा हातभार असल्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात पेशाने डॉक्टर असलेल्या काँग्रेसच्या डॉ.नामदेव उसेंडी यांच्या गळ्यात 2009 च्या निवडणूकीत मतदारांनी विजयाची माळ टाकली. त्यांनतर 2014 व 2019 अशा सलग दोन निवडनुकामध्ये पेशाने डॉक्टर असलेले डॉ देवराव होळी हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले त्यांनी 2019 मध्ये पेशाने डॉक्टर असलेल्या काँग्रेसच्या महीला उमेदवार डॉ. चंदा कोडवते यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा मिलिंद नरोटे यांच्या रूपाने एक तरुण डॉक्टर विधानसभेच्या आखाड्यात आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील मतदार कोणत्या डॉक्टर उमेदवाराला आपली पसंती देतात की इतर उमेदवाराला संधी देतात हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here