गडचिरोली कलेक्टर वर टांगती तलवार…मुंबई चे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील करणार चौकशी…

0
760

 

अजय टोप्पो आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल : मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील करणार तपास

 

 

गडचिरोली ( २१ सप्टेंबर) : एट्टापल्ली तालुक्यातील मौजा मलमपाडी येथील शेतकरी अजय टोप्पो यांच्या आत्महत्या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी राज्य मानवी हक्क आयोग आणि राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार करुन जिल्हाधिकारी संजय मिणा आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ८ सप्टेंबर रोजी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

 

दरम्यान गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी अजय टोप्पो यांची आत्महत्या हि घरगुती वादातून झाली असल्याचे प्रसिध्दीपत्रक काढून सारवासारव केली होती. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबियांनी गडचिरोली येथील पत्रकार परिषद घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडून सुरजागड लोह खाणीतून आलेला गाळाने झालेले शेतीचे नुकसान आणि संजय मिणा यांनी दिलेली असंवेदनशीलपणाची वागणूक यामुळेच आत्महत्या केली असल्याचा पुनरुच्चार करुन जिल्हाधिकारी संजय मिणा यांना उघडे पाडले होते. शासनाने उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी अजय टोप्पो यांच्या कुटूंबियांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

 

 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी ८ सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांकडे तक्रार केली त्याच दिवशी त्यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना याबाबतचे आदेश दिले होते. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी गृह विभागाच्या सचिवांना सदर प्रकरणी कळविले असता आज २१ सप्टेंबर रोजी गृह विभागाच्या विशेष शाखेचे प्रधान सचिव संजय सक्सेना यांच्या मार्फत हे प्रकरण शासनाने मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे सोपविले आहे.

 

 

दरम्यान अजय टोप्पो यांच्या आत्महत्येचे प्रकरण वरिष्ठ स्तरावर लावून धरल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या विरोधात तक्रारी दाखल करुन प्रकरण थांबविण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांचे काही लाभार्थी रेती तस्करांनी चालविला आहे. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता सदर आत्महत्या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे. उद्या २२ सप्टेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. राजेंद्र कोरडे, भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्षाचे शिष्टमंडळ सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची भेट घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here